YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 107:1-16

स्तोत्रसंहिता 107:1-16 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे, आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे. काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते, कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता. त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला; ते पतन पावले, त्यांना साहाय्य करण्यास कोणी नव्हता; तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.

Video for स्तोत्रसंहिता 107:1-16