स्तोत्रसंहिता 106
106
इस्राएलाची बंडखोरी
1परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
2परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकवील?
3जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!
4हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे;
5म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.
6आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे. आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे.
7आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले.
8तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.
9त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले.
10त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले.
11त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही.
12तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली.
13तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही.
14रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.
15तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला.
16त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला.
17तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले;
18त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले.
19त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली.
20त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणार्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.
21ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये,
22हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.
23तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.
24त्यांनी रम्य देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही.
25त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. परमेश्वराचा शब्द मानला नाही.
26तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात खाली पाडीन,
27त्यांची संतती राष्ट्रांत विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन.
28ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.
29त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली.
30तेव्हा फीनहासाने पुढे होऊन मध्यस्थी केली; आणि पटकी बंद झाली.
31हे त्याला नीतिमत्त्व असे पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
32मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले;
33कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.
34परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही,
35तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले,
36त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली; त्या त्यांना पाशरूप झाल्या.
37त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे बळी भुतांना दिले;
38त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली.
39ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले.
40त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला; त्याला आपल्या वतनाचा वीट आला.
41त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले; त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
42त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले; ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले.
43अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले, व आपल्या अनीतीने अधोगतीस पोहचले.
44तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली;
45त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.
46त्यांचा पाडाव करणार्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली.
47हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल.
48इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादि कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक “आमेन” म्हणोत. परमेशाचे स्तवन करा!1
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 106: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.