YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 7

7
व्यभिचारिणीच्या कारवाया
1माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
2माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ.
3ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.
4“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण;
5त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणार्‍या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल.
6मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले तो,
7भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला.
8तो तिच्या घराच्या कोपर्‍याजवळून जाणार्‍या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने
9संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला.
10तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली.
11ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत;
12कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते.
13तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले,
14“मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले.
15ह्यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस.
16मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे.
17मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.
18ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.
19कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे;
20त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.”
21तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले.
22तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो.
23जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो.
24तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या.
25तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.
26कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे; तिने वधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे.
27तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in