YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 28

28
दुष्ट आणि सात्त्विक
1कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
2देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते.
3दुबळ्यांना पिडणारा दरिद्री पुरुष, हा धुऊन नेणार्‍या व अन्न राहू न देणार्‍या पावसासारखा आहे.
4शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.
5दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना सर्वकाही समजते.
6धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा.
7सुज्ञ पुत्र नियमशास्त्र पाळतो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पाहायला लावतो.
8जो आपले धन वाढीदिढीने वाढवतो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवतो.
9नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.
10जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील.
11धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो.
12नीतिमानांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात.
13जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.
14जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो.
15गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे.
16ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो.
17रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.
18सरळ मार्गाने चालणार्‍याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो.
19जो आपली शेती स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते.
20स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही.
21तोंड पाहून वागणे बरे नाही, चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील.
22दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही.
23जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्‍याचेच शेवटी आभार मानतात.
24जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्‍याचा सोबती होय.
25लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.
26जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.
27जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात.
28दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात, त्यांचा नायनाट झाला म्हणजे नीतिमान वृद्धी पावतात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for नीतिसूत्रे 28