YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 25

25
नीतिशास्त्राची तत्त्वे आणि काही तुलना
1हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला.
2एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे.
3उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही.
4रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्‍यासाठी त्याचे चांगले पात्र बनते.
5राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल.
6राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस;
7कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे.
8फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्‍याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
9तुझा व तुझ्या शेजार्‍याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस;
10फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील.
11रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.
12सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्‍या कानाला आहे.
13कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्‍याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
14मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.
15बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.
16मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल.
17शेजार्‍याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.
18जो शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे.
19संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे.
20थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्‍यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे.
21तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे;
22असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्‍यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.
23उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.
24भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्‍याला बसणे पुरवले.
25तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय.
26दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे.
27मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही.
28ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for नीतिसूत्रे 25