नीतिसूत्रे 20
20
1द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.
2राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो.
3भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.
4हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.
5मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.
6दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?
7जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.
8राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो.
9“मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल?
10वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे.
11वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.
12ऐकणारे कान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले.
13निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील; आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल.
14“हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो.
15सोने आहे व मोतीही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे.
16जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.
17लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते.
18प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो; शहाणपणाने मार्गास लागून युद्ध चालव.
19जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्याची संगत धरू नकोस.
20जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल.
21आरंभी उतावळीने मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही.
22“वाइटाचा बदला मी घेईन” असे म्हणू नकोस; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.
23वजनावजनांत फरक असणे ह्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही.
24मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?
25“हे पवित्र आहे,” असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे, हे मनुष्याने पाशात पडणे होय.
26सुज्ञ राजा दुर्जनांना पाखडून टाकतो, त्यांच्यावर चाक फिरवून त्यांची मळणी करतो.
27मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो.
28दया व सत्य ही राजाचे रक्षण करतात; तो दयेने आपले सिंहासन दृढ करतो.
29बल हे तरुणांना भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.
30जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.
Currently Selected:
नीतिसूत्रे 20: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.