YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 16:17-33

नीतिसूत्रे 16:17-33 MARVBSI

दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो. गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय. ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करायला लावते. अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते. कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो. उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्‍याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो. कुटिल कल्पना योजण्याला जो डोळे मिचकावतो व ओठ चावतो तो दुष्कर्म घडवून आणतो. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो; ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.