नीतिसूत्रे 15:1-17
नीतिसूत्रे 15:1-17 MARVBSI
मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात. जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते. मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो; वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होतो. नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते. दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते. दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे. जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते; जो वाग्दंडाचा तिटकारा करतो तो मरेल. अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत! निंदकाला वाग्दंड आवडत नाही; तो ज्ञान्यांकडे जात नाही; आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते. बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करते; मूर्खाचे मुख मूर्खता भक्षते; दु:खग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे; पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.