YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 11

11
1खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.
2गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.
3सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो.
4क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.
5सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल.
6सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील.
7दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल.
8नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो.
9अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्‍याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात.
10नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो,
11सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो.
12जो आपल्या शेजार्‍याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करतो.
13लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो.
14शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अध:पात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते.
15परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणार्‍यांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो.
16कृपाळू स्त्री सन्मान संपादते, आणि बलात्कारी इसम धन संपादतात.
17दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो.
18दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते.
19ज्याच्या ठायी अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो.
20जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्त्विकतेचा आहे त्यांच्याबद्दल त्याला आनंद वाटतो.
21दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल.
22डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.
23नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे.
24एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो.
25उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.
26जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.
27जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल.
28जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील.
29जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल.
30नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो.
31पाहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल!

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for नीतिसूत्रे 11