YouVersion Logo
Search Icon

गणना 27

27
सलाफहादाच्या मुलींची विनंती
1मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या. त्यांची नावे ही : महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
2मोशे, एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्या उभ्या राहून म्हणाल्या,
3“आमचा बाप रानात मरण पावला; ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता तिच्यात तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला; त्याला मुलगे नव्हते.
4पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.”
5मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले.
6परमेश्वर मोशेला म्हणाला, 7“सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे; त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर तू त्यांना अवश्य वतनभाग द्यावा; त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर.
8तू इस्राएल लोकांना असे सांग, ‘कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.
9त्याला मुलगी नसली तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे.
10त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे.
11त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वांत जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे, म्हणजे तो ते भोगील.”’ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा.
मोशे आपल्या पश्‍चात यहोशवास नेता नेमतो
(अनु. 31:1-8)
12परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्राएल लोकांना देऊ केलेला आहे तो तेथून पाहा.
13तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.
14कारण त्सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्या वेळी त्या झर्‍याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले.” (त्सीन रानातील कादेश येथील मरीबा नावाचा हा झरा.)
15मोशे परमेश्वराला म्हणाला,
16“सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी;
17तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”
18तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे.
19एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर.
20आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील.
21तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”
22परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर उभे केले;
23आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले.

Currently Selected:

गणना 27: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for गणना 27