गणना 18
18
याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी तरतूद
1तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पवित्रस्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल; त्याचप्रमाणे याजकपदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल.
2लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी, म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे; पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे.
3तुझ्यावर सोपवलेली आणि तंबूसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी, पण पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये, आले तर ते व तुम्हीही मराल.
4त्यांनी तुझ्याबरोबर दर्शनमंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावीत; पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये.
5पवित्रस्थानाचे व वेदीसंबंधीचे कर्तव्य तुम्हीच करावे म्हणजे इस्राएल लोकांवर पुन्हा कोप होणार नाही.
6मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;
7पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”
8परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पाहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्राएल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत, तो तुमचा निरंतरचा हक्क होय.
9ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करायचा नाही त्यांपैकी तुझ्या वस्तू ह्या : इस्राएल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत.
10त्या वस्तू एखाद्या अति पवित्र स्थळी खाव्यात; तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्यात; त्या तू पवित्र समजाव्यात.
11त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच : इस्राएल लोकांची समर्पित दाने व त्यांची सगळी ओवाळण्याची अर्पणे, ही सर्व तुला व तुझ्यासहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावीत;
12सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथमउपज लोक परमेश्वराला अर्पण करतील तो मी तुला दिला आहे.
13ते आपल्या देशातील हरतर्हेचा प्रथमउपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणतील तो तुझा होय; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा.
14इस्राएल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय.
15उदरातून प्रथमजन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशू असोत, जे परमेश्वराला अर्पायचे ते सर्व तुझे होत; पण प्रथमजन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावेत आणि प्रथमजन्मलेले अशुद्ध पशू खंड घेऊन सोडून द्यावेत.
16ज्यांना खंड घेऊन सोडायचे ते एक महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरवलेले मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे;
17पण गाईचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये, ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा.
18त्याचे मांस तुझे होईल; ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी तसे हेही तुझेच आहे.
19जितकी पवित्र समर्पणे इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व मुलींचा निरंतरचा हक्क आहे; हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अति पवित्र आणि दृढ करार1 केला आहे.”
20परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळायचा नाही; इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.
21“लेवीचे वंशज दर्शनमंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत.
22येथून पुढे इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाजवळ येऊ नये, आले तर त्यांना पाप लागून ते मरतील.
23तर लेव्यांनीच दर्शनमंडपाची सेवा करावी; त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वाहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये काही वतन नसावे,
24कारण इस्राएल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करतात, ते लेव्यांचे वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत; म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळायचे नाही.”
25परमेश्वर मोशेला म्हणाला,
26“तू लेव्यांना सांग की, मी इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हांला नेमून दिले आहेत, ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा.
27हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणला जाईल.
28ह्या प्रकारे इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश तुम्हांला मिळतील त्यांतून काही परमेश्वराला समर्पित अंश म्हणून तुम्ही अर्पावेत; समर्पित अंश म्हणून परमेश्वराला केलेले हे अर्पण अहरोन याजकाला द्यावे.
29तुम्हांला जी सर्व दाने मिळतील, त्यांतून सगळा समर्पित अंश परमेश्वराला अर्पावा, हा पवित्र केलेल्या भागांतून म्हणजे उत्तम भागांतून घ्यावा.
30तू लेव्यांना सांग की, जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल, तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल.
31ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावीत; कारण दर्शनमंडपासंबंधीच्या तुमच्या सेवेचा हा मोबदला होय.
32तुम्ही त्यांतील उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हांला पाप लागणार नाही; इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू तुम्ही भ्रष्ट करू नयेत म्हणजे तुम्ही मरणार नाही.”
Currently Selected:
गणना 18: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.