YouVersion Logo
Search Icon

गणना 14

14
लोक परमेश्वराविरुद्ध बंड करतात
1तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले.
2सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.
3तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?”
4ते आपसात म्हणाले, “आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.”
5तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले, 6आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले;
7आणि ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे.
8परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल.
9तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीती बाळगू नका.”
10पण सर्व मंडळी म्हणू लागली की, “ह्यांना दगडमार करा.” तेव्हा दर्शनमंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीस पडले.
11मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत?
12मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.”
13मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस.
14आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस.
15आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील,
16‘जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले.’
17म्हणून मी विनवतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे; तू म्हटलेच आहेस की,
18‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’
19तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केलीस तशी ह्या वेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो.”
परमेश्वर इस्राएल लोकांचे ताडन करतो
(अनु. 1:34-40)
20तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.
21वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे;
22आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही;
23म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत.
24तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल.
25अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.”
26परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,
27“ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे;
28म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन;
29तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही
30ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.
31ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील;
32पण तुमची स्वत:ची प्रेते ह्या रानात पडतील.
33तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्‍या मेंढपाळासारखी होतील.
34देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’
35मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन; त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल; ते तेथे मरून जातील.”
अनिष्ट बातमी देणार्‍या दहा हेरांचा मृत्यू
36नंतर मोशेने देश हेरायला पाठवलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला चिथावले होते,
37ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले.
38तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले.
हर्मा येथे इस्राएल लोकांचा पराभव
(अनु. 1:41-46)
39मोशेने हे शब्द इस्राएल लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी फार विलाप केला.
40मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, “आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या ठिकाणी आम्ही जाऊ.”
41तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही.
42चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल.
43पाहा, तुमच्यापुढे अमालेकी व कनानी लोक आहेत म्हणून तुम्ही तलवारीने पडाल; तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही.”
44पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले; परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हलले नाहीत.
45तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.

Currently Selected:

गणना 14: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in