YouVersion Logo
Search Icon

गणना 12

12
मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध कुरकुर करतात
1मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. कारण त्याने कूशी लोकांतील स्त्री बायको करून घेतली होती.
2ते म्हणाले, “परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशीपण नाही का बोलला?” परमेश्वराने ते ऐकले.
3मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.
4मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला, “तुम्ही तिघे दर्शनमंडपाकडे या.” तेव्हा ते तिघे तिकडे गेले.
5परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले.
6परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.
7पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे.
8मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”
9परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला.
10तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली; अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले.
11तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले आहे, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस.1 12कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये.”
13मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.”
14पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला सात दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून सात दिवस तिला छावणीबाहेर कोंडून ठेव; नंतर तिला आत आणावे.”
15त्याप्रमाणे मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले; तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही.
16ह्यानंतर हसेरोथ येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले.

Currently Selected:

गणना 12: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in