YouVersion Logo
Search Icon

नहेम्या 6

6
विरोधकांच्या कारवाया
1मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लावले नव्हते; हे सनबल्लट, तोबीया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू ह्यांनी ऐकले.
2तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता.
3हे पाहून मी जासूद पाठवून त्यांना कळवले की, “मी मोठ्या कामात गुंतलो आहे; मला यायला सवड नाही; मी काम सोडून तुमच्याकडे का यावे, काम का बंद पाडावे?”
4त्यांनी चार वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले.
5पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले.
6त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, “निरनिराळ्या राष्ट्रांत अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहूदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे म्हणून तू हा कोट बांधत आहेस; ह्या अफवेवरून असे दिसते की, तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस.
7‘तू यहूदा देशात राजा आहेस’ असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहेस; हे वर्तमान राजाच्या कानी जाणार; ह्यासाठी आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू.”
8मी त्याला सांगून पाठवले की, “तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे.”
9आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर.
10मग मी शमाया बिन दलाया बिन महेटाबेल ह्याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता; त्याने म्हटले, “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभार्‍यात जमून मंदिराची दारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील; ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील.”
11मी म्हणालो, “माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.”
12विचार करता मला असे दिसून आले की, देवाने त्याला पाठवले नाही; तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्याविरुद्ध सांगितली; तोबिया व सनबल्लट ह्यांनी त्याला मोल देऊन ठेवले होते.
13मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते.
14हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्ट्री आणि वरकड संदेष्टे मला घाबरवू पाहत होते; त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव.
15अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्न दिवसांच्या आत कोट बांधून झाला.
16आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्‍या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.
17त्या काळात यहूदातल्या महाजनांची पत्रे तोबीयास जात असत व तोबीयाची पत्रे त्यांना जात असत.
18तो शखन्या बिन आरह ह्याचा जावई होता आणि त्याचा पुत्र योहानान ह्याने बरेख्याचा पुत्र मशुल्लाम ह्याच्या कन्येशी लग्न केले होते, म्हणून यहूदातल्या पुष्कळ लोकांनी त्याच्या बाजूने राहण्याची आणभाक केली होती.
19ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबीया मला घाबरवण्याकरता पत्रे पाठवत असे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in