YouVersion Logo
Search Icon

मार्क 9

9
1आणखी, तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो की, येथे उभे असणार्‍यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
येशूचे रूपान्तर
2मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपान्तर झाले.
3आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही.
4तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते.
5तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”
6काय बोलावे हे त्याला सुचले नाही; कारण ते भयभीत झाले होते.
7तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’
8मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.
9नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’
10हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले.
11मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलीया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?”
12त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय?
13तथापि मी तुम्हांला सांगतो, एलीया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”
शिष्य भूतग्रस्त मुलाला बरे करण्यास असमर्थ
14नंतर ते शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले.
15त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्‍चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला.
16त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”
17तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे.
18तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.”
येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो
19ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”
20त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
21तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून.
22ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”
23येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्‍याला सर्वकाही शक्य आहे.”
24लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.”
25तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्‍या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”
26तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.
27पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला.
28मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?”
29तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्‍या कशानेही निघणारी नाही.”
आपल्या मृत्यूबद्दल येशूने दुसर्‍यांदा केलेले भविष्य
30नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती.
31कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.”
32परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.
नम्रतेविषयी धडा
33पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
34ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.
35त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
36मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला,
37“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
सहिष्णुतेचे शिक्षण
38योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
39येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही.
40कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
41तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो.
इतरांना अडखळवण्याविरुद्ध इशारा
42माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे.
43तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक;
44दोन हात असून नरकात म्हणजे न विझणार्‍या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
45,46तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
47,48तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
49कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील].
50मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”

Currently Selected:

मार्क 9: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in