YouVersion Logo
Search Icon

मार्क 6

6
येशूचा नासरेथात अव्हेर
1नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.
2मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात!
3जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले.
4तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.”
5त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही.
6त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्‍चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला.
बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे
7नंतर त्या बारा जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला; त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला.
8आणि त्यांना आज्ञा केली की, ‘वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका.
9तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.’
10आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा.
11आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. [मी तुम्हांला खचीत सांगतो की, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्यांना सोपे जाईल].”
12ते तेथून निघाले व लोकांनी पश्‍चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली,
13पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा वध
14हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.”
15कोणी म्हणत, “हा एलीया आहे.” कोणी म्हणत, “हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे.”
16परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यांतून उठला आहे.”
17आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते,
18व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.”
19ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना;
20कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.
21नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली.
22आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.”
23तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”
24तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर!”
25तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, “माझी इच्छा अशी आहे की, बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे.”
26तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही.
27राजाने लगेच आपल्या पहार्‍यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली; त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला,
28आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले.
29हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.
बारा प्रेषितांचे परत येणे
30ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
31तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकान्तात चला व थोडा विसावा घ्या;” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यासदेखील सवड होईना.
32तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले.
33लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले.
34येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.
पाच हजार लोकांना भोजन
35दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे;
36तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”]
37त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?”
38तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.”
39नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले.
40तेव्हा ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.
41मग त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढण्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले.
42मग सर्व जण जेवून तृप्त झाले.
43आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले.
44भाकरी खाणारे [सुमारे] पाच हजार पुरुष होते.
येशू पाण्यावरून चालतो
45नंतर, ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा,’ असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले.
46मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.
47आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता.
48त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता;
49पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले;
50कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.”
51आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्‍चर्यचकित झाले.
52कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते.
येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो
53नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्‍यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला.
54ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले.
55आणि ते आसपासच्या सर्व भागांत चोहोकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकर्‍यांना बाजेवर घालून नेऊ लागले.
56तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते दुखणेकर्‍यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत.

Currently Selected:

मार्क 6: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Free Reading Plans and Devotionals related to मार्क 6

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy