मार्क 4
4
पेरणार्याचा दाखला
1पुन्हा तो समुद्रकिनार्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते.
2नंतर तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला,
3“ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
4आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले.
5काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले;
6आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.
7काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही.
8काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.”
9मग तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
10तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले.
11तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते;
12ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.”
13तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील?
14पेरणारा वचन पेरतो.
15वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
16तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;
17तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.
18काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात,
19व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.
20चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
दिवा व बी ह्यांचे दाखले
21आणखी तो त्यांना म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?
22कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते.
23कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको.”
24पुन्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल.
25कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
26आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो,
27आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.
28जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.
29पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”
30आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?
31ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला,
32तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.”
33असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.
34आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.
येशू वादळ शांत करतो
35त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.”
36तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते.
37नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला.
38तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?”
39तेव्हा त्याने उठून वार्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले.
40नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?”
41तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”
Currently Selected:
मार्क 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.