मीखा 6
6
इस्राएलाशी परमेश्वराचा वाद
1आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐका : ऊठ, पर्वतांसमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे.
2पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.
3“हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे.
4मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.
5माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?
6“मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय?
7हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?”
8हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
9परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्याचे ऐका.
10अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय?
11दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय?
12तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;
13म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.
14तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस; तुझ्या ठायी कंगालपणा राहील; तू धनाची सारासार करशील, पण ते तुला वाचवता येणार नाही व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन.
15तू पेरशील, पण कापणी करणार नाहीस; तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस; द्राक्षीचा उपज तुडवशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस.
16अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”
Currently Selected:
मीखा 6: MARVBSI
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.