मत्तय 23
23
शास्त्री व परूशी ह्यांचा निषेध
1तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला,
2“शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत;
3म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत.
4जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत.
5आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;
6जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने,
7बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते.
8तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात.
9पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.
10तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय.
11पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.
12जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल.
13अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्यांनाही आत जाऊ देत नाही.
14[अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]
15अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता.
16अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो.’
17अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर?
18तुम्ही म्हणता, ‘कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’
19अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी?
20म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो;
21आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्याची शपथ घेतो;
22आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्याची शपथ घेतो.
23अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.
24अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता!
25अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत.
26अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल.
27अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.
28तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.
29अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता;
30आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’
31ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता.
32तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.
33अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?
34म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;
35ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.
36मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील.
यरुशलेमेच्या भवितव्याबाबत येशूचे दु:खोद्गार
37यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
38पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’
39मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.”
Currently Selected:
मत्तय 23: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.