मत्तय 19
19
सूटपत्राविषयीचा प्रश्न
1मग असे झाले की, हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात गेला;
2तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले.
3मग परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?”
4त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’,
5व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’
6ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
7ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?”
8तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते.
9मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”
10शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.”
11तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात.
12कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणांस नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”
येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो
13नंतर त्याने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले; परंतु शिष्यांनी आणणार्यांना दटावले.
14येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
15मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला.
एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न
16नंतर पाहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, “उत्तम गुरूजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?”
17तो त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे; तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”
18तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,
19आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’
20तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?”
21येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”
22पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.
श्रीमंतीपासून होणारे तोटे
23तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे.
24मी आणखी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
25हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क
26येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”
27तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?”
28येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.
29आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;
30परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल.
Currently Selected:
मत्तय 19: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.