मत्तय 10
10
बारा प्रेषित व त्यांचे काम
1तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला.
2त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,
3फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय,
4शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
5ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका;
6तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा.
7जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’
8रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या.
9सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका,
10वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे.
11ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा.
12आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा.
13ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.
14जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.
15मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.
16पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
17माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील,
18आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.
19जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल.
20कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.
21भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;
22आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
23जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.
24गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही.
25शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?
26ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
27जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.
28जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.
29दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही.
30तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत.
31म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.
32जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन;
33पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
34मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे.
35कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे;
36आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’
37जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;
38आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.
39ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील.
40जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.
41संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.
42आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”
Currently Selected:
मत्तय 10: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.