लूक 7
7
शताधिपतीचा चाकर
1नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला.
2तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता.
3त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे.
4त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे;
5कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.”
6तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही;
7ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल.
8कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.”
9ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.”
10नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
विधवेचा मुलगा
11नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला.
12तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.
13तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”
14मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”
15तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.
16तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”
17त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.
बाप्तिस्मा करणारा योहान
18ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले.
19मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
20ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
21त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती.
22मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’
23जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
24मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय?
25तर मग काय पाहण्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोशाख करणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.
26तर तुम्ही काय पाहण्यास गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, होय; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.
27‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो,
तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो
तोच आहे.
28मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.”
29आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.
30परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
31तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?
32जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात,
‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला,
तरी तुम्ही नाचला नाहीत;
आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’
33बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.
34मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!
35परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”
येशूच्या चरणांना तैलाभ्यंग व दोन कर्जदारांचा दृष्टान्त
36परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला.
37तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली;
38आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.
39तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”
40तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.”
41“एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते.
42देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
43शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.”
44तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.
45तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही.
46तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले.
47ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”
48मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
49तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?”
50मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
Currently Selected:
लूक 7: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.