YouVersion Logo
Search Icon

लूक 6:37-49

लूक 6:37-49 MARVBSI

तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.” त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही; तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणाएका घर बांधणार्‍या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्‍या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”