लेवीय 26
26
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
(अनु. 7:12-24; 28:1-4)
1तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
2तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.
3तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल, 4तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
5धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल; तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल.
6मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.
7तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील.
8तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.
9मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हांला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन.
10तुम्ही बरेच दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल.
11मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही.
12मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल.
13मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.
आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा
(अनु. 28:15-68)
14परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही, ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत,
15माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,
16तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील.
17मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.
18इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,
19तुमच्या बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुम्हांला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन;
20तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत.
21तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.
22मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
23एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाहीत आणि माझ्याविरुद्ध वागलात,
24तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.
25मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.
26मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.
27एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात,
28तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.
29आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल.
30तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.
31मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.
32मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील.
33परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.
34जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगत राहील; तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगत राहील.
35देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल; म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
36तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.
37कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही.
38राष्ट्राराष्ट्रांत पांगून तुम्ही नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हांला ग्रासून टाकील.
39तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशांत आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील.
40त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील,
41तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील.
42तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
43त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील.
44इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे;
45मी त्यांच्याकरता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.”
46जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्राएल लोकांमध्ये सीनाय पर्वतावर मोशेच्या हस्ते ठरवले ते हेच होत.
Currently Selected:
लेवीय 26: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.