YouVersion Logo
Search Icon

लेवीय 24

24
दिव्याची काळजी
(निर्ग. 27:20-21)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
3अहरोनाने दर्शनमंडपात साक्षीच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळ-पासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी; हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
4त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी.
समक्षतेची भाकर
5तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
6त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा-सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
7प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल.
8दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्यात; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
9ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र स्थळी खावी; कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पण केलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”
दुर्भाषण आणि नुकसानभरपाई
10त्या काळी कोणा इस्राएल स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएल लोकांमध्ये गेला, तेव्हा तो आणि एक इस्राएल माणूस छावणीत भांडू लागले.
11तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.
12त्याच्यासंबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.
13मग परमेश्वराने मोशेला सांगितले,
14“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.
15तू इस्राएल लोकांना सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
16जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जिवे मारावे.
17जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे.
18जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.
19कोणी आपल्या शेजार्‍याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे;
20अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी.
21पशू मारणार्‍याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्‍याला जिवे मारावे.
22तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
23मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

Currently Selected:

लेवीय 24: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for लेवीय 24