YouVersion Logo
Search Icon

लेवीय 19

19
पावित्र्य व न्याय ह्यांसंबंधी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.
3तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
4तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
5तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा.
6त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसर्‍या दिवशी खावे, पण तिसर्‍या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
7तिसर्‍या दिवशी ते खाणे अमंगळ कृत्य होय; ते मान्य व्हायचे नाही.
8ते खाणार्‍याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी, कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
9तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपर्‍यातील पीक झाडून सारे कापू नकोस आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सरवा वेचू नकोस.
10आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नकोस, तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नकोस, गरीब व उपरे ह्यांच्यासाठी ती राहू द्यावीत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
11तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.
12माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.
13आपल्या शेजार्‍यावर जुलूम करू नकोस व त्याला लुबाडू नकोस. मजुराची मजुरी रात्रभर, दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.
14बहिर्‍याला शिव्याशाप देऊ नकोस, किंवा ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नकोस, पण तू आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.
15न्यायनिवाडा करताना अन्याय करू नकोस, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नकोस आणि समर्थापुढे नमू नकोस; तर आपल्या शेजार्‍याचा न्याय निःस्पृहपणे कर.
16आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.
17आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्‍याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.
18सूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.
19माझे विधी पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नकोस; दोन जातींचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नकोस; भिन्न सुतांनी विणलेला कपडा अंगात घालू नकोस.
20जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल, तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; तथापि तिची मुक्तता झालेली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये.
21त्या पुरुषाने दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा;
22आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्या द्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
23तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहचल्यावर खाण्यासाठी हरतर्‍हेची फळझाडे लावाल तेव्हा त्यांची फळे निषिद्ध1 समजावीत; तीन वर्षेपर्यंत ती तुम्हांला निषिद्ध1 होत, ती खाऊ नयेत;
24पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत.
25मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
26तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका; तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.
27आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका.
28कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.
29तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नकोस; नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल.
30तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.
31पंचाक्षर्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
32पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.
33कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका.
34तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
35न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका.
36तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे;
37म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावेत; मी परमेश्वर आहे.”

Currently Selected:

लेवीय 19: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in