लेवीय 11
11
शुद्ध व अशुद्ध प्राणी
(अनु. 14:3-21)
1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांगा की, पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे : 3पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत;
4पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशू खाऊ नयेत; उंट हा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
5शाफान1 रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
6ससा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा.
7डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंथ करत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
8त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांच्या शवांना शिवू नये; तुम्ही ते अशुद्ध समजावे.
9जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे : जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत.
10जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रांत व नद्यांत संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावेत;
11तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत.
12जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत.
13पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर,
14घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे,
15निरनिराळ्या जातींचे कावळे,
16शहामृग, गवळण,2 कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे,
17पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
18पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड,
19करकोचा, निरनिराळ्या जातींचे बगळे,3 टिटवी आणि वाघूळ.
20जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावेत.
21पण चार पायांवर चालणार्या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावेत.
22त्यांच्यापैकी तुम्ही खावेत ते हे : निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातींचे नाकतोडे, निरनिराळ्या जातींचे खरपुडे, व निरनिराळ्या जातींचे गवत्ये टोळ.
23तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत.
24त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा.
25त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
26ज्या पशूचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंथ करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा. जो कोणी त्याला शिवेल तो अशुद्ध समजावा.
27चार पायांवर चालणार्या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजांवर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावेत, त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
28जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावेत.
29जमिनीवर रांगणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे : मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,
30चोपय (सापसुरळी), घोरपड, पाल, सांडा व गुहिर्या सरड.
31जमिनीवर रांगणार्या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावेत. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
32त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर तीही अशुद्ध समजावी; मग ते लाकडी पात्र, वस्त्र, कातडे, तरट, किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते शुद्ध होईल.
33त्यांच्यापैकी एखादा मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
34त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा; आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे;
35आणि त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून पाडून टाकावी; त्यामुळे ती अशुद्ध होते, म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
36तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते; तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा.
37त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाणांवर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे.
38तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
39खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
40कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
41जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; ते खाऊ नयेत.
42जमिनीवर रांगणार्यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
43तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका.
44मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.
45कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”
46पशू, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील
47अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”
Currently Selected:
लेवीय 11: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.