विलापगीत 4
4
सीयोनेच्या शिक्षेची पूर्तता
1सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत.
2शुद्ध सुवर्णतुल्य सीयोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभारांच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात!
3कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे!
4तान्ह्या मुलाची जीभ तृषेमुळे त्याच्या टाळूस चिकटते; लहान मुले भाकर मागतात, पण त्यांना ती मोडून देण्यास कोणी नाही.
5जे पूर्वी पक्वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत.
6सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.
7तिचे सरदार1 बर्फाहून स्वच्छ होते, दूधाहून पांढरे होते; ते पोवळ्याहून कांतीने लाल होते; त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते;
8त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे; त्यांना आळ्यांतून कोणी ओळखत नाही; त्यांची त्वचा त्यांच्या हाडांना चिकटली आहे; ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे.
9क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.
10कोमलहृदयी स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली; ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली.
11परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.
12विरोधी व शत्रू यरुशलेमेच्या वेशीत शिरतील, ह्या गोष्टीवर पृथ्वीवरचे राजे, जगातले सर्व रहिवासी ह्यांनी विश्वास ठेवला नाही.
13तिच्या संदेष्ट्यांच्या पातकांमुळे व तिच्या याजकांच्या दुष्कर्मांमुळे हे झाले; त्यांनी तिच्या वस्तीत नीतिमानांचा रक्तपात केला आहे.
14ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.
15“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”
16परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.
17आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.
18ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात म्हणून आम्हांला आमच्या आळ्यांत फिरवत नाही; आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत; आमचा अंत आलाच आहे.
19आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.
20परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.
21ऊस देशात राहणार्या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे; पेला तुझ्याकडेही येईल; तू मस्त होऊन आपणास नग्न करशील.
22हे सीयोनकन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे; तो तुला आणखी पकडून नेणार नाही; हे अदोमकन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील.
Currently Selected:
विलापगीत 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.