विलापगीत 2
2
सीयोनेचा शोक परमेश्वराकडून
1हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.
2प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.
3त्याने संतप्त क्रोधाने इस्राएलाचे हरएक शृंग छेदून टाकले आहे; शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे; सभोवतालचे सर्वकाही चाटून जाणार्या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.
4त्याने वैर्याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.
5प्रभू वैर्यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.
6बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.
7परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.
8सीयोनकन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे; त्याने सूत्र ताणले आहे; तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही. त्याने कोट व नगराचा तट ह्यांना शोक करायला लावले आहे; ते दोन्ही म्लान झाले आहेत.
9तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.
10सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.
11माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.
12घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला, तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, “धान्य व द्राक्षारस कोठे आहेत?”
13मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?
14तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.
15येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”
16तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”
17परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्यांचा उत्कर्ष केला आहे.
18“त्यांचे हृदय प्रभूचा धावा करीत आहे; हे सीयोनकन्येच्या तटा, तू रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ, ते खळू देऊ नकोस; तुझ्या डोळ्याच्या बाहुलीला विसावा देऊ नकोस.
19ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.
20हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?
21तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.
22तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”
Currently Selected:
विलापगीत 2: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.