यहोशवा 9
9
गिबोनाच्या रहिवाशांची फसवेगिरी
1हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे 2एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढायला जमा झाले.
3यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले, 4तेव्हा आपल्यापरीने त्यांनीही कपटाची युक्ती योजली; त्यांनी प्रवासासाठी शिधासामग्री घेतली1 आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणपाटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले;
5त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुनेपुराणे कपडे चढवले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या.
6ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”
7इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”
8ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहोत.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आलात?”
9त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;
10आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथनिवासी बाशानाचा राजा ओग, ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत.
11तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, ‘प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करारमदार करा.’
12ह्या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊनऊन होत्या; पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत.
13हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटूनतुटून गेले आहेत; हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.”
14तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.
15मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाक केली.
16त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
17नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही : गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.
18पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली.
19तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
20त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवदान देणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
21सरदारांनी लोकांना सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले.
22यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून ‘आम्ही फार दूरचे आहोत’ असे सांगून आम्हांला का फसवले?
23म्हणून आता तुम्हांला असा शाप आहे की, तुमच्यातल्या कोणालाही दास होणे चुकायचे नाही; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणके होऊन राहाल.”
24त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जिवाची भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
25आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
26त्याने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातांतून सोडवले; त्यांची कत्तल केली नाही.
27यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या ठिकाणातील त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
Currently Selected:
यहोशवा 9: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.