YouVersion Logo
Search Icon

यहोशवा 5

5
गिलगाल येथे वल्हांडण सण पाळणे व सुंता
1इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्‍यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्‍याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.
2त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्‍या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”
3त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुर्‍या बनवून गिबअथ हा-अरालोथ2 येथे इस्राएल लोकांची सुंता केली.
4यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की, युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.
5मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;
6कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.
7त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती.
8सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.
9मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे.” म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.
10इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.
11वल्हांडणाच्या दुसर्‍याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला.
12त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना बंद झाला, तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
यहोशवा आणि तलवार उपसून उभा राहिलेला पुरुष
13यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”
14तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”
15परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in