YouVersion Logo
Search Icon

यहोशवा 18

18
शिलो येथील प्रदेशाची वाटणी
1मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.
2परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.
3यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?
4प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे.
5त्यांनी त्याचे सात भाग करावेत; यहूदाने दक्षिणेकडील आपल्या नेमलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे.
6सात भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
7लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही; परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती हीच त्यांचे वतन होय; गाद, रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांना ते दिले आहे.”
8मग ते पुरुष मार्गस्थ झाले; तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहिण्यासाठी जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की, “जा, देशभर फिरा. आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
9तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या सात वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशवाकडे आले.
10शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश
11बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा : त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता.
12त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्‍चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ-आवेनच्या रानापर्यंत जाते.
13तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते.
14तेथून मग पश्‍चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्‍चिम सीमा हीच.
15दक्षिणेकडील सीमा पश्‍चिमेकडे सुरू होऊन किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते;
16तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्‍याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्‍यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते;
17तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन-शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते; तेथून ती रऊबेनपुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते.
18मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ-अराबाच्या बाजूने खाली अराबात येते.
19तेथून ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते; ही दक्षिण सीमा होय.
20यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमांसहित त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे.
21बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,
22बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,
23अव्वीम, पारा, अफ्रा,
24कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी;
25गिबोन, रामा व बैरोथ;
26मिस्पे, कफीरा व मोजा;
27रेकेम, इर्पैल व तरला;
28सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in