योएल 1
1
देशाची टोळांकडून नासाडी
1पथूएलाचा पुत्र योएल ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
2अहो वृद्धांनो, हे ऐका; देशातील सर्व रहिवाशांनो कान द्या. तुमच्या काळात अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात अशी गोष्ट कधी घडली होती काय?
3तुम्ही हे आपल्या मुलाबाळांना कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे.
4कुरतडणार्या टोळांपासून जे राहिले ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणार्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणार्या टोळांनी खाल्ले; चाटून खाणार्या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
5अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणार्यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.
6माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत; त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत; त्यांना सिंहिणीचे सुळे आहेत.
7त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे; माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत; सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे; आणि त्याच्या फांद्या पांढर्या झाल्या आहेत.
8तरुण स्त्री गोणपाट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते तसा शोक करा.
9परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे; परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
10शेताचे रान झाले आहे; भूमी रुदन करत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे; नवा द्राक्षारस आटला आहे; तेल क्षय पावले आहे.
11शेतकर्यांनो, निराश व्हा; द्राक्षीचे मळे करणार्यांनो, गहू व जवस ह्यांकरता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे.
12द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.
13याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.
14उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.
15त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.
16आमच्या डोळ्यांदेखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय? आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय?
17ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत; कोठारे पडून गेली आहेत; कारण पिके बुडाली आहेत.
18गुरेढोरे कशी धापा टाकत आहे! बैलांचे कळप घाबरले आहेत, कारण त्यांना चारा नाही; मेंढरांचे कळपही पिडले आहेत.
19हे परमेश्वरा, तुझा मी धावा करतो, कारण रानातील कुरणे अग्नीने खाल्ली आहेत, शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
20वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे; तुझा सोस लागून ते धापा टाकत आहेत; पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत; अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
Currently Selected:
योएल 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.