YouVersion Logo
Search Icon

ईयोब 33

33
अलीहू ईयोबाला दोष लावतो
1तर आता हे ईयोबा, माझे भाषण श्रवण कर. माझे सगळे बोलणे ऐकून घे.
2पाहा, आता मी आपले तोंड उघडले आहे; माझी जीभ माझ्या तोंडात हलू लागली आहे.
3माझ्या मनातले विचार जसेच्या तसे माझ्या शब्दांनी प्रकट होणार; माझ्या वाचेने प्रकट होणारे ज्ञान माझ्या तोंडून निष्कपटपणे निघणार.
4देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्वसमर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे.
5तुला उत्तर देता येईल तर दे; सिद्ध हो, माझ्यापुढे उभा राहा.
6पाहा, देवापुढे मी तुझ्यासारखाच आहे; मीही मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे.
7माझ्या धाकाने तुला घाबरायला नको; माझा दाब तुला भारी होणार नाही.
8तुझे बोलणे माझ्या कानी पडले, तुझे शब्द मी ऐकले, ते हे :
9‘मी शुद्ध आहे, मी निरपराध आहे; मी निष्कलंक आहे, मी निर्दोष आहे;
10पाहा, देव कसा माझ्याविरुद्ध निमित्त शोधतो; तो मला शत्रू गणतो;
11तो माझे पाय खोड्यात घालतो; तो माझ्या सगळ्या चालचालणुकीवर नजर ठेवतो.’
12पाहा, मी तुला ह्याचे उत्तर देतो; हे तुझे बोलणे यथार्थ नाही; कारण देव मानवाहून थोर आहे.
13‘तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही,’ म्हणून का तू त्याच्याशी वाद घालतोस?
14देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो; पण तो त्याकडे चित्त देत नाही.
15स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता,
16देव त्याचे कान उघडतो; त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो.
17तेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो;
18तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्‍या नाशापासून त्याचा जीव वाचवतो.
19कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगत बिछान्यावर लोळत राहतो; त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते;
20त्याचा जीव अन्नाला कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टान्नाचा तिटकारा येतो.
21त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो; त्याची हाडे पूर्वी दिसत नसत, ती बाहेर येतात.
22शेवटी तो गर्तेजवळ जाऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणार्‍यांच्या तावडीत जाते.
23मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्याला आढळला,
24तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’
25मग त्याचे शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात.
26तो देवाची प्रार्थना करतो, आणि तो त्याच्यावर प्रसन्न होतो; तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो; देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करतो.
27तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही;
28त्याने माझा जीव राखला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जिवाला प्रकाश लाभला आहे.’
29पाहा, हे सर्व देव मनुष्याला दोनतीनदा करतो;
30असा तो त्याचा जीव गर्तेपासून वाचवतो, म्हणजे तो जीवनप्रकाशाने प्रकाशित होतो.
31हे ईयोबा, कान देऊन माझे ऐक; उगा राहा, मला बोलू दे.
32तुला काही उत्तर द्यायचे असेल तर ते दे; बोल, कारण तुला निर्दोष ठरवायची माझी इच्छा आहे.
33नाहीतर माझे ऐक; उगा राहा, मी तुला ज्ञान सांगतो.”

Currently Selected:

ईयोब 33: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in