YouVersion Logo
Search Icon

ईयोब 24

24
दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार
1सर्वसमर्थाने न्यायसमय का नेमून ठेवले नाहीत? त्याला ओळखणार्‍यांना त्याच्या दिवसांची का प्रतीती येत नाही?
2काही लोक मेरेच्या खुणा सारतात; ते बकर्‍यामेंढ्या हरण करून चारतात;
3ते पोरक्यांचे गाढव हाकून पळवून नेतात; विधवेचा बैल गहाणादाखल अडकवून ठेवतात;
4ते कंगालाना मार्गातून बाजूला करतात; देशातील दीनदुबळ्यांना एकत्र लपूनछपून राहावे लागते.
5पाहा, वनांतल्या रानगाढवांप्रमाणे ते भक्ष्य मिळवण्याच्या उद्योगास बाहेर पडतात; त्यांच्या मुलाबाळांसाठी जंगल त्यांना अन्न पुरवते.
6ते शेतात आपल्या गुरांसाठी चारा कापतात, आणि दुर्जनाच्या द्राक्षांच्या मळ्यातली राहिलीसाहिली द्राक्षे वेचतात.
7त्यांना वस्त्रांवाचून उघडे पडून रात्र काढावी लागते, थंडीतही पांघरायला त्यांना काही नसते;
8डोंगरावरील पर्जन्यवृष्टीने त्यांना भिजावे लागते; त्यांना कसलाही आश्रय न मिळून खडकालाच बिलगून राहावे लागते.
9काही लोक बापपोरक्यास आईच्या स्तनांपासून ओढून काढतात; कंगालास ते गहाणाने बांधून टाकतात.
10ते नागडेउघडे चोहोकडे फिरतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशी मरतात;
11ते त्यांच्या आवारात राहून तेल काढतात; ते द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडवतात तरी तहानलेले राहतात.
12दाट वस्तीच्या नगरातून त्यांचा विलाप चाललेला असतो; घायाळ झालेल्यांचा आक्रोश होत असतो; पण देव ह्या अधर्माकडे लक्ष देत नाही.
13कित्येक प्रकाशाला विरोध करतात; त्यांच्या वाटा ते ओळखत नाहीत; ते त्याच्या मार्गांनी जात नाहीत.
14खुनी मनुष्य मोठ्या पहाटेस उठून दीनदुबळ्यांचा घात करतो; रात्री तो चोर बनतो.
15व्यभिचारी मनात म्हणतो की, ‘कोणी मला पाहू नये,’ म्हणून तो दिवस मावळण्याची वाट पाहत असतो; तो आपले तोंड झाकून घेतो.
16रात्री ते घरे फोडतात, दिवसा लपून राहतात; त्यांना उजेडाची ओळखही नसते.
17त्या सर्वांना प्रभातसमय मृत्युच्छायाच भासतो; त्यांना मृत्युच्छायेच्या भयाचा चांगला अनुभव असतो.
18पाण्यावरून त्वरित वाहून जाणार्‍या पदार्थासारखे ते आहेत; पृथ्वीवरचे रहिवासी त्यांच्या वतनाला शाप देतात; आपल्या द्राक्षांच्या मळ्यांकडील वाटेने त्यांचे पुन्हा येणे होत नाही.
19अवर्षण व उष्णता ही बर्फाचे पाणी नाहीसे करतात; तसाच अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो.
20त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल. कीटक त्याच्यावर चंगळ करतील; त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही; असा दुष्टांचा वृक्षाप्रमाणे निःपात होईल.
21अपत्यहीन वंध्येस त्याने ग्रासले; विधवेचे त्याने कधी बरे केले नाही.
22तरी बलिष्ठांनाही देव आपल्या सामर्थ्याने राखतो; त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात.
23तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.
24ते उन्नती पावतात; तरी अल्पकाळातच ते नाहीतसे होतात; ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते, कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात.
25हे खरे नाही असे म्हणून मला कोण लबाड ठरवील? माझे म्हणणे निरर्थक आहे असे कोण दाखवून देईल?”

Currently Selected:

ईयोब 24: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in