YouVersion Logo
Search Icon

ईयोब 20

20
दुष्टाच्या प्रतिफळाचे सोफर वर्णन करतो
1मग सोफर नामाथी म्हणाला,
2“माझे विचार मला उत्तर सुचवतात, हे माझ्या ठायीच्या स्फूर्तीने होत आहे.
3माझ्या अप्रतिष्ठेला कारण होणारी निर्भर्त्सना मला ऐकणे प्राप्त झाले, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे माझे मन मला उत्तर सुचवते.
4मानवाची पृथ्वीवर स्थापना झाली तेव्हापासूनचा हा सनातन नियम तुला ठाऊक नाही काय?
5की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
6त्याचे माहात्म्य गगनास जाऊन पोहचले; त्याचे शिर मेघमंडळास जाऊन लागले,
7तरी त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल; त्याला जे पाहत असत ते विचारतील, ‘तो कोठे गेला?’
8तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही; रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील,
9ज्या नेत्रांना तो दिसला त्यांना तो पुनरपि दिसणार नाही. त्याच्या ठिकाणाला त्याचे पुन्हा दर्शन होणार नाही.
10त्याची मुलेबाळे गरिबांचे आर्जव करतील; त्याचे हात त्याने लुबाडलेले वित्त परत करतील.
11त्याच्या हाडांत तारुण्याचा जोम भरला आहे; पण तो त्याच्याबरोबर मातीस मिळेल.
12दुष्टता त्याच्या जीभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेवली,
13ती त्याने तशीच राखून ठेवली, सोडली नाही, आपल्या तोंडातच धरून ठेवली,
14तरी त्याचे अन्न त्याच्या पोटात पालटून त्याचे त्याच्या ठायी फुरशांचे विष बनेल.
15त्याने धन गिळले होते ते तो ओकून टाकील. देव ते त्याच्या पोटातून बाहेर काढील.
16तो फुरशांचे विष चोखील; नागाचा दंश त्याचा प्राण हरण करील,
17त्याला नद्यांचे म्हणजे अर्थात मधाचे, दूधदुभत्याचे प्रवाह व ओघ ह्यांचे दर्शन व्हायचे नाही.
18त्याने श्रम करून मिळवले ते त्याने परत दिले पाहिजे, त्याला ते गिळून टाकता येणार नाही; त्याने मिळवलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही.
19तो दुबळ्यांस चिरडून तसाच टाकून गेला आहे; म्हणून त्याने जबरीने एखादे घर घेतल्यास ते त्याला वाढवून बांधता येणार नाही.
20त्याच्या मनाला तृप्ती म्हणून कधी वाटली नाही, म्हणून त्याला आपल्या कोणत्याही इष्ट वस्तुनिशी निभावून जाता येणार नाही.
21त्याने ग्रासले नाही असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकायची नाही.
22आबादानीच्या काळातही त्याला अडचण पडेल; प्रत्येक कंगालाचे हात त्याच्यावर पडतील.
23असे होईल की त्याच्या पोटाची भर करण्यास देव त्याच्यावर आपला क्रोधाग्नी पाखडील; आणि तो अन्न खात असता त्याच्या क्रोधवृष्टीचा प्रवेश त्याच्या पोटात होईल.1
24लोखंडी शस्त्रापासून तो निभावला तरी पितळी तीर त्याला विंधून टाकील.
25तो तीर उपटून काढील, तो त्याच्या शरीरातून बाहेर येईल; चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल; दहशती त्याच्यावर येतील.
26त्याच्या निधीवर काळोख नेमला आहे; फुंकावा लागत नाही असा अग्नी त्याला ग्रासून टाकील; त्याच्या डेर्‍यात जे काही उरले असेल तेही तो स्वाहा करील;
27आकाश त्याचा अधर्म प्रकट करील; पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल.
28त्याच्या घरातील संपदा चालती होईल; देवाच्या क्रोधदिनी ती धुऊन जाईल.
29देवाकडून नेमलेला हा दुर्जनाचा वाटा आहे; देवाने ठरवलेले हे त्याचे वतन आहे.”

Currently Selected:

ईयोब 20: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in