YouVersion Logo
Search Icon

ईयोब 19

19
देव आपल्याला निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“तुम्ही कोठवर माझ्या जिवाला दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?
3एवढ्यात दहा वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली; तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता ह्याची तुम्हांला लाज कशी वाटत नाही?
4मी काही चूक केलीच असली, तर ती माझी मला.
5तुम्ही माझ्यावर खरोखर तोरा मिरवणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार,
6तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे; त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे.
7मी ‘जुलूम! जुलूम!’ असे ओरडतो पण कोणी ऐकत नाही; मी दाद मागतो पण मला न्याय मिळत नाही.
8त्याने माझा रस्ता अडवला आहे. मला पुढे जाता येत नाही; त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे;
9त्याने माझे वैभव हरण केले आहे; माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढला आहे
10त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे; त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे.
11त्याने माझ्यावर आपला कोप भडकवला आहे; तो मला आपल्या शत्रूंत गणत आहे.
12त्यांच्या फौजा जमून माझ्यावर मोर्चा लावत आहेत; त्यांनी माझ्या डेर्‍याभोवती तळ दिला आहे.
13त्याने माझ्या भाऊबंदांना माझ्यापासून दूर केले आहे; माझ्या ओळखीपाळखीचे मला पारखे झाले आहेत.
14माझे आप्त मला अंतरले आहेत; माझे इष्टमित्र मला विसरले आहेत.
15माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात; त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे.
16माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही; मला तोंडाने त्याची विनवणी करावी लागते.
17माझा श्वास माझ्या स्त्रीला अप्रिय वाटतो; माझ्या सहोदरांना माझी किळस येते.
18पोरेसोरेदेखील मला तुच्छ लेखतात; मी उठायला लागलो असता माझी चेष्टा करतात.
19माझे सगळे जिवलग मित्र माझा तिटकारा करतात; ज्यांच्यावर मी प्रेम करी ते माझ्यावर उलटले आहेत.
20माझे मांसचर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहे; मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे.
21माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा हो, दया करा; कारण देवाचा हात माझ्यावर पडला आहे.
22देव करीत आहे तसा तुम्ही माझा छळ का करता? तुम्ही असोशीने माझे मांस का तोडता?
23माझे शब्द लिहून काढले, ते ग्रंथात लिहून ठेवले,
24लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले, तर किती बरे होईल!
25मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील;
26ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन;
27त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे!
28ह्या सगळ्याचे मूळ माझ्या ठायीच आढळून आले आहे, म्हणून ‘ह्याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा,’ असे तुम्ही म्हणाल,
29तर तुम्ही तलवारीचे भय धरा; कारण क्रोधाबद्दल तलवारीचे शासन होते, ह्यावरून न्याय आहे हे तुम्हांला समजावे.”

Currently Selected:

ईयोब 19: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in