YouVersion Logo
Search Icon

ईयोब 16

16
देवाच्या कृत्यांविषयी ईयोबाची तक्रार
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकल्या आहेत; तुम्ही सगळे भिकार सांत्वनकर्ते आहात.
3असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल? प्रत्युत्तर करण्याची तुला कोठून स्फूर्ती झाली?
4तुमच्यासारखे मलाही बोलता येईल; तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर मलाही तुमच्यावर वाग्जाल पसरता आले असते, तुमच्याकडे पाहून मला आपले डोके हलवता आले असते;
5पण मी तुम्हांला आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणार्‍या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते.
6मी बोललो तरी माझ्या शोकाचे शमन होत नाही; मी गप्प राहिलो तरी माझे दुःख कोठे कमी होत आहे?
7पण त्याने1 मला व्याकूळ केले आहे; तू1 त्याने माझ्या सर्व परिवाराचा विध्वंस केला आहेस.
8तू मला पकडले आहे, हीच माझ्याविरुद्ध साक्ष आहे; माझा रोडपणा माझ्यासमोर माझ्याविरुद्ध साक्षी असा उठला आहे.
9त्याने क्रोधायमान होऊन मला फाडून टाकले आहे; त्याने माझ्याशी वैर मांडले आहे, तो माझ्यावर दातओठ खात आहे. माझा वैरी माझ्यावर डोळे वटारत आहे.
10लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.
11देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे. दुष्कर्म्यांच्या हाती दिले आहे.
12मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केला आहे. त्याने माझी मानगुट धरून मला आपटून माझे तुकडे केले आहेत; मला त्याने मारा करण्याचे निशाण केले आहे.
13त्याचे बाण माझ्यासभोवार उडत आहेत; माझी गय न करता त्याने माझी कंबर मोडली आहे; त्याने माझे पित्त जमिनीवर पाडले आहे.
14खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करतो; तो वीराप्रमाणे माझ्यावर धावून आला आहे.
15मी आपल्या त्वचेवर तरट शिवले आहे. मी आपले शृंग धुळीत लोळवले आहे.
16रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे; माझ्या पापण्यांवर मृत्युच्छाया पडली आहे;
17माझ्या हातून काही अन्याय झाला नाही; माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे, तरी असे झाले.
18अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझ्या आरोळीस कोठेही खंड न पडो.
19ह्या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी उर्ध्वलोकी आहे.
20माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत; पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत.
21ह्यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा.
22कारण जेथून परत येता येत नाही अशा मार्गाने थोड्याच वर्षांनी मी जाणार.”

Currently Selected:

ईयोब 16: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in