YouVersion Logo
Search Icon

ईयोब 12

12
देवाचे सामर्थ्य व ज्ञान ह्यांचा ईयोब पुरस्कार करतो
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“खरेच, तुम्हीच काय ते मानवप्राणी; तुम्ही मेला की ज्ञान नष्ट झालेच.
3मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे; मी काही तुमच्याहून कमी नाही; अहो, असल्या गोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?
4मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांनी हसावे ना! नीतिमान व सात्त्विक मनुष्याला हसावे ना!
5सुखी मनुष्याच्या मते विपत्ती तिरस्कारास पात्र आहे; ज्यांचे पाय लटपटतात त्यांचा तिरस्कार तत्काळ होतो.
6लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवतात ते निर्भय राहतात, ते आपल्या हातालाच आपला देव समजतात.1
7तू पशूंना विचार, ते तुला शिकवतील; आकाशातील पक्ष्यांना विचार, ते तुला समजावून देतील;
8अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवील; समुद्रातील मत्स्य तुला सांगतील.
9परमेश्वराच्या हाताने हे घडले आहे असे ह्या सर्वांवरून कोणाला समजायचे नाही?
10त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे.
11जीभ अन्नाची रुची घेते, तसा कान शब्दांची पारख करीत नाही काय?
12वृद्धाच्या ठायी ज्ञान असते; दीर्घायू मनुष्याच्या ठायी समज असते.
13त्याच्या2 ठायी ज्ञान व बल आहेत; युक्ती व समज ही त्याचीच आहेत.
14पाहा, तो जे मोडतो ते पुन्हा उभारता येत नाही; त्याने एखाद्याला बंधनात ठेवले तर त्याला कोणाच्याने खुले करवत नाही.
15पाहा, तो जलवृष्टी आवरतो आणि सर्व पाणी आटून जाते; ती तो सोडतो आणि तिच्यामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होते.
16सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.
17तो राजमंत्र्यांना अनवाणी घेऊन जातो; तो न्यायाधीशांना मूढ ठरवतो.
18तो राजांची सत्ता मोडतो, त्यांच्या कंबरेस बंधन लावतो.
19तो याजकाला अनवाणी घेऊन जातो, स्थिरपदी असलेल्यांना तो उलथून टाकतो.
20तो भरवशाच्या मनुष्याची तोंडे बंद करतो, वृद्धांचा विवेक हरण करतो.
21तो सरदारांवर उपहासाचा वर्षाव करतो, प्रबलांचा कमरबंद सैल करतो.
22तो गूढ गोष्टी अंधकारातून काढून प्रकट करतो; तो मृत्युच्छायेला प्रकाश दाखवतो.
23तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करतो; तो राष्ट्रांचा विस्तार करून मग त्यांचा संकोच करतो.
24तो पृथ्वीवरील लोकनायकांची बुद्धी हरण करतो, त्यांना मार्गरहित वैराण प्रदेशात भटकायला लावतो.
25त्यांचा प्रकाश नाहीसा होऊन ते अंधकारात चाचपडत असतात. तो त्यांना मद्यप्यांसारखे झोकांडे खायला लावतो.”

Currently Selected:

ईयोब 12: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in