योहान 5:24-40
योहान 5:24-40 MARVBSI
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले; आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही, आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही; कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता;1 कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही.