योहान 15:1-15
योहान 15:1-15 MARVBSI
मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.