योहान 14:5-14
योहान 14:5-14 MARVBSI
थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.” फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.