YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 7

7
आपली वागणूक व कृती सुधारा
1यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे :
2“परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.
3सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन.
4‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका.
5जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल,
6परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही,
7तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन.
8पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता.
9हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता
10आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता.
11माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाले आहे काय? पाहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
12तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा.
13परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;
14म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन;
15आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन.
मूर्तिपूजेमुळे देवाचा क्रोध
16ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही.
17यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना?
18मुलेबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवतात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांना पेयार्पणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणीक तिंबतात; असे ते मला क्रोधास पेटवतात.
19परमेश्वर म्हणतो, ते मला संताप आणतात? का स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात?
20ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”
बंडखोरीबद्दल यहूदाला शिक्षा
21सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, “तुमच्या यज्ञबलींत आपल्या होमबलींची भर घाला व मांस खात जा.
22तुमच्या पूर्वजांना मी मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवशी होमबलींविषयी किंवा यज्ञबलींविषयी मी त्यांना काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही.
23तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की, ‘माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हांला सांगतो त्याने चाला.’
24तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.
25तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक जे संदेष्टे तुमच्याकडे मी पाठवत आलो, त्यांना मोठ्या निकडीने पाठवत आलो;
26पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.
27तू ही सर्व वचने त्यांना सांगशील तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत.
28त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.
29हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’
30कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.
31आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.
32ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत लोक इत:पर त्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर ‘वधाचे खोरे’ म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील.
33ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.
34हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 7