YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 52

52
सिद्कीयाची कारकीर्द
(२ राजे 24:18-20; २ इति. 36:11-16)
1सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ती लिब्ना येथील यिर्मया ह्याची कन्या.
2यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
3परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.
यरुशलेमेचा पाडाव
(२ राजे 24:20—25:7; यिर्म. 39:1-7)
4त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.
5सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता.
6चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना.
7मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.
8तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग केला; त्यांनी सिद्कियाला यरीहोच्या मैदानात गाठले, व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.
9मग त्यांनी राजाला पकडून हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.
10बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे पुत्र त्याच्या डोळ्यां-देखत वधले; तसेच त्याने यहूदाचे सर्व सरदार रिब्ला येथे मारून टाकले.
11मग त्याने सिद्कीयाचे डोळे फोडले; बाबेलच्या राजाने त्याला बेड्या घालून बाबेलास नेले व त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत त्याला कैदेत ठेवले.
12पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.
13त्याने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.
14गारद्यांच्या नायकाबरोबर आलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेचे सर्व तट पाडून टाकले.
15मग गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले अगदी कंगाल लोक, नगरात उरलेले अवशिष्ट लोक, फितूर होऊन बाबेलच्या राजाच्या पक्षास मिळालेले लोक व अवशिष्ट राहिलेले कारागीर ह्या सर्वांना बंदिवान करून नेले.
16तरी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना द्राक्षमळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.
17परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, परमेश्वराच्या मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे सर्व पितळ बाबेलास नेले.
18पात्रे, फावडी, चिमटे, वाटगे धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.
19ह्यांखेरीज, पेले, अग्निपात्रे, वाटगे, बहुगुणी, समया, चमचे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.
20दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल हे शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ पुष्कळ होते.
21एकेका खांबाची उंची अठरा हात होती, व त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे; त्याची जाडी चार बोटे होती; खांब पोकळ होता.
22त्यांच्या वरल्या भागी पितळेचे कळस होते; एकेका कळसाची उंची पाच हात होती; त्याच्याभोवती सर्व जाळीकाम व डाळिंबे पितळेची होती; दुसर्‍या खांबावरही तसेच काम व डाळिंबे होती.
23चोहो बाजूंस शहाण्णव डाळिंबे होती; एकंदर जाळीकामावर सर्व मिळून शंभर डाळिंबे होती.
24गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले;
25योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजास त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे सात पुरुष त्याला शहरात आढळले त्यांना त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतींचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ असामी त्यांनाही त्याने नेले.
26गारद्यांचा सरदार नबूजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले.
27बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.
28नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे : सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले.
29नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी यरुशलेमेहून आठशे बत्तीस माणसे नेली.
30नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने सातशे पंचेचाळीस यहूद्यांना पकडून नेले; एकंदर चार हजार सहाशे लोकांना नेण्यात आले.
31यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी अवील-मरोदख बाबेलचा राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याचे डोके वर करून त्याला कारागृहातून बाहेर काढले.
32त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले.
33त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.
34त्याच्या निर्वाहाकरता त्याला बाबेलच्या राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in