YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 43

43
मिसर देशास जाणे
1मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव ह्याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठवली ती सर्व त्या सर्वांना सांगण्याचे यिर्मयाने संपवले.
2तेव्हा अजर्‍या1 बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाला म्हणाली, “तू खोटे बोलतोस; तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळवण्यास परमेश्वर आमचा देव ह्याने तुला पाठवले नाही;
3तर तू आम्हांला खास्द्यांच्या हाती द्यावे आणि त्यांनी आम्हांला जिवे मारावे, आम्हांला बंदिवान करून बाबेलास न्यावे म्हणून बारूख बिन नेरीया तुला आमच्याविरुद्ध मथवत आहे.”
4योहानान बिन कारेह, सर्व सेनानायक व सर्व लोक ह्यांनी यहूदा देशात राहण्याविषयी परमेश्वराची वाणी ऐकली नाही;
5तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले;
6पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या ह्यांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांना आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूख बिन नेरीया ह्यांना त्यांनी नेले.
7ते मिसर देशास गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही; ते तहपन्हेस येथे जाऊन पोहचले.
8तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :
9“आपल्या हाती मोठे धोंडे घे व यहूदाच्या लोकांसमक्ष तहपन्हेस येथल्या फारोच्या राजगृहाच्या द्वाराशी जो चौक आहे त्यात ते चुना लेपून लपवून टाक;
10आणि त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, माझा सेवक नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी लपवून ठेवले आहेत त्यांवर त्याचे सिंहासन ठेवीन; मग तो त्यांवर आपला भव्य गालिचा पसरील.
11तो येऊन मिसर देशावर मारा करील; जे मरायचे ते मरणाच्या, जे बंदिवासात जायचे ते बंदिवासाच्या व जे तलवारीने वधायचे ते तलवारीच्या स्वाधीन करण्यात येतील.
12शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.
13तो मिसर देशातले जे बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील.”’

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 43