यिर्मया 32
32
यिर्मया अनाथोथ येथे शेत विकत घेतो
1यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी म्हणजे नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.
2त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्यांच्या चौकात बंदीमध्ये होता.
3यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने त्याला अटकेत टाकले तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, “तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देतो, व तो ते हस्तगत करील;
4आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातून सुटणार नाही, तर बाबेलच्या राजाच्या हाती खातरीने दिला जाईल; तो त्याच्याशी समक्ष बोलेल, आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील;
5आणि तो सिद्कीयाला बाबेलास नेईल व मी त्याचा समाचार घेईन तोवर तो तेथे राहील, असे परमेश्वर म्हणतो; तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुमची सरशी होणार नाही?”
6यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
7पाहा, तुझा चुलता शल्लूम ह्याचा पुत्र हानामेल तुझ्याकडे येऊन म्हणेल, ‘अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे.’
8तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.
9मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले.
10मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.
11तेव्हा शर्ती नमूद केलेल्या खरेदीखताची एक मोहोरबंद व एक उघडी अशा नकला मी घेतल्या;
12आणि माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यासमक्ष व ज्यांनी खरेदीखतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्यासमक्ष पहारेकर्यांच्या चौकात जे यहूदी बसले होते त्या सर्वांसमक्ष ते खरेदीखत बारूख बिन नरीया बिन महसेया ह्याच्या स्वाधीन केले.
13मी त्यांच्यासमक्ष बारुखाला बजावून सांगितले की,
14‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मोहोरबंद व उघडे अशी ही दोन्ही खरेदीखते घेऊन एका मातीच्या पात्रात घालून ठेव म्हणजे ती बरेच दिवस राहतील.
15कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’
16मी ते खरेदीखत नरीयाचा पुत्र बारूख ह्याला दिल्यावर परमेश्वराची प्रार्थना केली की,
17‘अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही.
18तू हजारांवर दया करतोस, बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस; थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे,
19तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;
20तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस.
21तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस;
22आणि तू त्यांच्या पूर्वजांना प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेला हा देश, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा हा देश त्यांना दिला;
23त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.
24पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.
25तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’
26मग परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,
27“पाहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय?
28ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी हे नगर खास्द्यांच्या हाती देईन, ते बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन व तो ते हस्तगत करील.
29आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील.
30कारण इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज ह्यांनी तरुणपणापासून माझ्या दृष्टीने अगदी वाईट ते केले; इस्राएलाचे वंशज आपल्या हातच्या कर्मांनी केवळ मला संतापवत आहेत, असे परमेश्वर म्हणतो.
31हे नगर त्यांनी बांधले तेव्हापासून आजवर माझा क्रोध व संताप चेतवण्यास हे कारण झाले, येथवर की ते मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकावे.
32इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज म्हणजे ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे, यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांनी मला चिडवावे म्हणून जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे मी असे करीन.
33त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.
34तर ज्या मंदिराला माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापल्या.
35यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
36तरी आता ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता की, ‘ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे बाबेलच्या राजाच्या हाती जायचे आहे,’ त्याविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो,
37पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.
38ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
39त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे भय बाळगावे ह्यासाठी मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
40आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.
41मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.
42कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी ह्या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोललो ते सर्व त्यांना प्राप्त करून देईन.
43ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल.
44बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”
Currently Selected:
यिर्मया 32: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.