YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 25

25
बाबेलमुळे सत्तर वर्षे वाताहत
1यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :
2यिर्मया संदेष्ट्याने यहूदाचे सर्व लोक व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना सांगितले की,
3“यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही.
4परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही.
5ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल;
6अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजनपूजन करण्यास त्यांच्यामागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही.’
7तरी आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणून आपले नुकसान करून घ्यावे म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो.
8ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत.
9म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.
10त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.
11हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.
12तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.
13मी त्या देशाविषयी जी वचने बोललो आहे, आणि सर्व राष्ट्रांविषयी यिर्मयाने ह्या संदेशग्रंथात जे लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्वकाही त्या देशावर आणीन.
14त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.
राष्ट्रांसाठी संतापरूप प्याला
15परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;
16म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तलवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.”
17तेव्हा परमेश्वराच्या हातून मी तो प्याला घेतला व ज्या राष्ट्रांकडे परमेश्वराने मला पाठवले त्या सर्वांना तो पाजला;
18म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.
19मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक ह्यांना,
20सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,
21अदोम, मवाब व अम्मोनी लोक ह्यांना,
22सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,
23ददान, तेमा, बूज व केसांची चोंच काढणारे ह्या सर्वांना,
24अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणार्‍या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे ह्यांना,
25जिम्री, एलाम व मेदी ह्यांच्या सर्व राजांना,
26परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.
27“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’
28जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच.
29कारण पाहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणतो, तर तुम्ही अगदी शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हांला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मारण्यासाठी मी तलवार बोलावत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.’
30ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्‍यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील.
31पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’
32सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.
33त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.
34मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.
35मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत.
36मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे.
37परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत.
38तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्‍या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 25