यिर्मया 21
21
यरुशलेमेच्या नाशाचे भाकीत
1सिद्कीया राजाने मल्कीयाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मयाकडे पाठवून सांगितले,
2“आमच्याकरता परमेश्वराला प्रश्न कर; बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आमच्याबरोबर लढाई करीत आहे. तो आमच्यापासून निघून जावा म्हणून परमेश्वर कदाचित आपल्या सर्व अद्भुत कृतींना अनुसरून आमच्याशी वर्तेल काय? असे विचार;”
3यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कियाला तुम्ही असे सांगा :
4‘इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, पाहा, तटाबाहेर तुम्हांला वेढा घालणारा बाबेलचा राजा व खास्दी लोक ह्यांच्याशी ज्या शस्त्रांनी तुम्ही लढत आहात ती मी उलटवीन आणि त्यांना ह्या नगरामध्ये एकत्र करीन.
5राग, संताप व क्रोध ह्यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वत: लढेन.
6ह्या नगरात राहणारी माणसे व पशू ह्यांना मी मारीन; ती मोठ्या मरीने मरतील.
7परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’
8ह्या लोकांना असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवतो.
9ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.
10कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’
यहूदाच्या राजांविरुद्ध भविष्ये
11यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका : 12‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’
13“परमेश्वर म्हणतो, अगे खोर्यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे.
14परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”
Currently Selected:
यिर्मया 21: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.