YouVersion Logo
Search Icon

शास्ते 5

5
दबोरा आणि बाराक ह्यांचे गीत
1त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गाइलेले गीत हे :
2“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
3राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
4हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले.
5परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनायदेखील थरारला.
6अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या दिवसांत, याएलेच्या दिवसांत राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करत.
7मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते; मुळीच उरले नव्हते.
8लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? 9माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
10शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्‍यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्‍यांनो, वाटेने चालणार्‍यांनो, ह्याचे गुणगान करा.
11पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजानन वेशींवर चालून गेले.
12जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
13तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्यासाठी वीरांविरुद्ध सामना करायला उतरले.
14अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
15इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोर्‍यात धावले. रऊबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली.
16खिल्लारांसाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
17गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजांपाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनार्‍यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यांवर बसून राहिला.
18जबुलून व नफताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
19राजे येऊन लढले; त्या वेळी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांजवळ तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट घेतली नाही.
20आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.
21कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जिवा, हिंमत धरून पुढे चाल.
22त्या वेळी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
23परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या. त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करायला, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करायला ते आले नाहीत.
24केनी हेबेर ह्याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेर्‍यात राहणार्‍या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
25त्याने पाणी मागितले तर तिने त्याला दूध दिले; श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.
26तिने आपला एक हात मेखेला, आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
27तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला, निश्‍चल झाला; तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
28सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यायला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली?
29तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले :
30त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकेक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे. लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी एकदोन रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना?
31हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in