YouVersion Logo
Search Icon

शास्ते 11

11
अम्मोन्यांच्या हातांतून इफ्ताह इस्राएल लोकांना सोडवतो
1इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता; तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता.
2गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले; हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, “तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले.
3तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले.
4काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी युद्ध पुकारले.
5अम्मोनी लोक इस्राएलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले.
6ते इफ्ताहाला म्हणाले, “चला, आमचे सेनापती व्हा म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू.”
7इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून?”
8गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि अम्मोनी लोकाशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल.”
9गिलादाच्या वडील जनांना इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोकांशी युद्ध करायला तुम्ही मला स्वदेशी परतवले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय?”
10गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “परमेश्वर तुमच्या-आमच्यामध्ये साक्षी आहे; तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू.”
11मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला; लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखवले.
12पुढे इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, “माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे?”
13अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.”
14इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा :
15इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही,
16पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले;
17तेव्हा त्यांनी जासुदांच्या हाती अदोमाच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून जाऊ दे; पण अदोमाच्या राजाने आमचे ऐकले नाही; तसेच त्यांनी मवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकायला तयार नव्हता, म्हणून इस्राएल कादेश येथे वस्ती करून राहिले.
18त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती.
19मग अमोर्‍यांचा राजा, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन, ह्याच्याकडे इस्राएलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, ‘कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे.’
20पण सीहोनाला इस्राएलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही; उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्राएलाशी युद्ध केले.
21तरीपण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी ह्यांचा सारा मुलुख इस्राएलांनी हस्तगत केला.
22अर्थात आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोर्‍यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला.
23इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्‍यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय?
24तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्यासाठी हाकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील.
25मवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्राएलाशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय?
26हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?
27मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.”
28इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठवलेला हा निरोप त्याने जुमानला नाही.
29मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह गिलाद व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पे येथे आला आणि गिलादी मिस्पे येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला.
30इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस,
31तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.”
32मग अम्मोनी लोकांशी युद्ध करायला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले.
33अरोएरापासून मिन्नीथपर्यंतच्या वीस नगरांत आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्राएल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरवला.
इफ्ताहाची कन्या
34इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.
35तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, “हाय! हाय! मुली, तू माझे मन खचवले आहेस; तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस; परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.”
36ती त्याला म्हणाली, “बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणेच माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे.”
37ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, “मात्र माझ्यासाठी एवढे करा की मला दोन महिन्यांचा अवधी द्या म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन.”
38तो म्हणाला, “जा.” आणि त्याने तिला दोन महिन्यांसाठी पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करत राहिली.
39दोन महिन्यांनंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी शरीरसंबंध झाला नव्हता.
40ह्यावरून इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for शास्ते 11